शहीद जवान दत्ता वाघमारे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

काटी: , दि . १३ : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील  शहीद जवान दत्ता लक्ष्मण वाघमारे यांच्या पार्थिवावर सोमवार दि. 13 रोजी दुपारी 4:30 वाजता  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

यावेळी ‘शहिद जवान दत्ता वाघमारे अमर रहे, वीर जवान तुझे सलाम’ अशा घोषणांनी माळुंब्रा परिसर दणाणून गेला. पुणे येथे कर्तव्यावर असताना त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रविवार दि.12 रोजी निधन झाल्याने त्यांना  हौतात्म्य प्राप्त झाले. शहीद दत्ता वाघमारे यांनी 101 इन्फंट्री मराठा बटालियन आणि डिफेन्स सेक्युरिटी फोर्समध्ये अशी एकूण 30 वर्षे देशसेवा केली.


सोमवारी दुपारी 3:15 वाजता  त्यांचे पार्थिव पुणे येथून रुग्णवाहिकेतून माळुंब्रा येथे  आणण्यात आले. शहीद जवान दत्ता वाघमारे यांना सैन्यदलात भरती होण्यासाठी ज्यांनी प्रोत्साहन देऊन सैन्यदलात भरती केले ते माळुंब्र्याचे सुपुत्र सैन्य दलातील सुभेदार लक्ष्मण उत्तम वडणे यांनीच शहीद दत्ता वाघमारे यांचे पार्थिव गावात आणले. यावेळी गावातील वातावरण शोकाकुल बनले होते.


वीरमाता अनुसया वाघमारे, वीरपत्नी ज्योती, मुलगा अजय वाघमारे यांच्यासह, जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक तथा अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी, आप्तस्वकीयांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.यावेळी सैन्य दल व पोलिसांच्यावतीने बंदुकीच्या पाच फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. शहीद दत्ता वाघमारे यांचे चिरंजीव अजय वाघमारे यांनी त्यांच्या पार्थिवाला मुख अग्नी दिला. यावेळी  नागरिकांची  उपस्थिती होती.