महिला आरक्षणासाठी शरद पवार यांचे महत्वाचे योगदान


काटी , दि . १३ : उमाजी गायकवाड

 काटी ता. तुळजापूर येथे रविवार दि. 12 जुन रोजी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  ग्रामीण भागात पक्षाची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा संपन्न झाला.


राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या  प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तुळजापूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे गटनेते महेंद्र धुरगुडे आदीची प्रमुख   उपस्थिती होती.  
     

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्ते मोदी लाटेत भाजपवाशी झाल्याने ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सायंकाळी काटी येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पक्षवाढीवर भर देण्यात आला. त्याचबरोबर, स्थानिक समस्या सोडविण्यासह गावपातळीवर संघटन करण्यास कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. तसेच येथील इंदिरा नगर व बसस्थानकावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखेचे उद्घघाटन करण्यात आले.
       

यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर म्हणाल्या की,   राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच आमचे नेते असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नंतर महीला आरक्षणासाठी शरद पवारांचे महत्वाचे योगदान असून त्यांच्यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील महिलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करता येणे शक्य झाले. शरद पवार यांनी जातीय वादाला कधीही थारा दिला नाही हे खुद्द भाजपचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीच मान्य केले आहे. हिंदू मुस्लिम बांधव ऐक्याने राहत आहेत.  


भविष्यात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येणार असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी वज्रमूठ बांधून  उत्साहात कामाला सुरुवात करण्याचे आवाहन केले.
   

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार म्हणाले की, मज्जीद, मंदीर यावरील भोंगे काढा, हनुमान चालीसा कोणाच्या दारापुढे जाऊन म्हणा हे नवीन फॅड निघाले असून भाजपच्या वाचाळवीरामुळे जागतिक पातळीवर नाचक्की होत आहे. शरद पवार यांनी महाविकास आघाडी स्थापन करुन विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. येथील स्थानिक कामे, समस्या सोडविण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. 
        

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष अशोक जाधव, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष विनोद जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे,  दिनकर पवार, शाखाध्यक्ष धनाजी गायकवाड, उपाध्यक्ष रामेश्वर लाडुळकर, वक्तासेल तालुकाध्यक्ष त्रिगुणशील साळुंके, बबन हे्डे, अप्पा बनसोडे, जुबेर शेख, नजीब काझी, बाळु क्षिरसागर,अशोक राऊत,काकडे आदींसह वडगाव (काटी), सावरगाव, केमवाडी,वाणेवाडी आदी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते  उपस्थित होते.