सरपंच-ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात बंड; उपसरपंचासह आठ सदस्य मैदानाबाहेर
सरपंच-ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात बंड; उपसरपंचासह आठ सदस्य मैदानाबाहेर
उपसरपंचासह आठ सदस्यांचा राजीनामा
सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभाराचा आरोप; विकासकामांत अनियमितता होत असल्याचे सांगत सदस्यांचे धक्कादायक पाऊल
नळदुर्ग, दि. ३० सप्टेंबर :
तुळजापूर तालुक्यातील कटगाव ग्रामपंचायतीत कारभारावरून अंतर्गत धुसफूस उफाळून आली असून, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या कथित मनमानी कारभारामुळे विकासकामांत अनियमितता होत असल्याचा आरोप करत उपसरपंचासह तब्बल आठ सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. १३ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीतील आठ सदस्यांनी एकाचवेळी राजीनामे दिल्याने ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली असून, सत्ताधारी गटातील दोन सदस्यांचाही त्यात समावेश असल्याने या घडामोडीने राजकीय रंग घेतला आहे.
राजीनामा देणाऱ्या सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचा, तसेच विकासकामांमध्ये कथित अनियमितता होत असल्याचा आरोप केला आहे. कारभाराबाबत वारंवार मतभेद निर्माण होत असल्याने अखेर सदस्यांनी राजीनाम्याचा मार्ग स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.
उपसरपंच जगदेवी शिवानंद कोणाळे यांच्यासह सदस्य प्रकाश अशोक पाटील, अलाउद्दीन अहमद घाटवाले, मुकेश राम शिवशिंगावले, सूर्यकांत वसंत कांबळे, संगीता सतीश खोबरे,अंजना सुर्यकांत जोकार,कोमल योगेश धुते राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. यामध्ये काँग्रेसच्या सहा, तर भाजपच्या दोन सदस्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
राजीनाम्यामुळे ग्रामपंचायतीसमोर पेच
१३ पैकी आठ सदस्यांनी राजीनामे दिल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. हे राजीनामे स्वीकारले जाणार की संबंधित सदस्यांची समजूत काढून राजीनामे मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राजीनामा देणाऱ्या सदस्यांनी केलेल्या आरोपांबाबत सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, याकडेही ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.





















